पालघर जिल्ह्याला एमएच ६० ही नवीन ओळख

मुंबई: आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला एमएच ६० ही नवीन परिवहन ओळख मिळाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ९ एप्रिल रोजी संपर्कमंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोकदरबारामध्ये लवकरच पालघरमधील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन मी दिले होते. त्याची पूर्तता या निमित्ताने होत असून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे परिवहनविषयक कामासाठी वसई-विरारला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सहाजिकच त्यांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे.

पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.