ठाणे : मेट्रो रेल्वेच्या कावेसर कास्टिंग यार्डच्या विविध कामांना सुरुवात होताच प्रकल्पाच्या १० किमी परिघात ठाणेकरांच्या कानांवर सकाळ-रात्रभर उच्च स्तरातील विविध ‘ध्वनी’ आदळणार आहेत तर विविध मेट्रो कामांच्या ध्वनीचा सर्वाधिक त्रास नौपाडावासींच्या कानांवर आदळणार आहे.
ठाणे शहरात मेट्रोचे काम वेगात सुरू असून किमान पाच वर्षे या कामाच्या खडखडाटाचा सर्वाधिक त्रास नौपाडावासींना होणार आहे. मेट्रो प्रकल्पाची सर्व कामे संपल्यानंतरच १० किलोमीटरच्या परिघातील रहिवाशांची या त्रासातून सुटका होईल.
मोघरपाडा मेट्रो कार डेपो आणि कावेसर येथील तात्पुरत्या कास्टिंग यार्डमध्ये ६. ३१ हेक्टर्समध्ये प्रि-कास्ट गर्डर्सच्या व्यतिरिक्त विविध तांत्रिक, यांत्रिकी कामे दिवस-रात्र करण्यात येणार आहेत. शिवाय तेथे साईट कार्यालये, रेडी-मिक्स काँक्रिट प्लांट, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, मजबुतीकरण, फॅब्रिकेशन यार्ड आणि बांधकामांच्या अंतर्गत गंजरोधक एपॉक्सि कोटिंग प्लांट (ईपीओ) उभारण्यात येणार आहे तसेच या क्षेत्रात कावेसर कास्टिंग यार्ड तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे पाच वर्षांसाठी उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांवर ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’च्या (एमसीझेएमए) पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा प्रभाव आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’ तील एका वरिष्ठ अधिका-याने ‘ठाणेवैभंव’ला दिली.
या प्रकल्प क्षेत्रात सतत ये-जा करणा-या वाहनांच्या सतत वाहतुकीमुळे आवाजाची पातळी वाढणे हे कारणीभूत आहे. हे लक्षात घेऊन एमएमआरडीएने आवाजाची पातळी जास्त कुठे होईल, यासाठी ‘ध्वनी वाचन ’ आठ वेगवेगळ्या ठिकाणी घेतले.
एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्प क्षेत्रात, सर्वात वर्दळीच्या रस्त्याजवळ तो किंचित जास्त आवाज ऐकू येतो. दिवसा आणि संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत अशा सर्व आठ ठिकाणी विविध स्तरांचे परीक्षण करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या स्थानी उच्च आवाजाची पातळी केवळ गर्दीच्या वेळीच दिसून येते, असेही निदर्शनास आले आहे.
विविध ठिकाणच्या आवाजांची पातळी (डेसीबलमध्ये)
स्थान दिवसा रात्री
मोघरपाडा ६७.०९ ५८.०३
कावेसर ६३. ५५ ५३.२२
नवघर ६६.११ ५७.९४
कोकणी पाडा ६६.७५ ५८. ३७
ठाणे ६५.५९ ५५.६०
भिवंडी ६५.५९ ५५.६०
खारबांव ६१.०० ५२.००
नौपाडा ७२.०० ६३.००