मीरा-भाईंदर शहरात डिसेंबरपर्यंत मेट्रो धावणार !

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग-९ चे काम जलदगतीने सुरू असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून डिसेंबर २०२५ मध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

मीरा-भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याबाबत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि महापालिका आयुक्त संजय काटकर उपस्थित होते. यावेळी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० पैकी तीन मार्गिका या अवजड वाहनांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याबाबत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्त संजय काटकर यांनी दिली.

शहरात ‘दहिसर-भाईंदर मेट्रो मार्गिका ९ तयार करण्यात येत आहे. कंत्राटदाराला देखील २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७ टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गिकेचे काम पूर्ण केले जात आहे. या मेट्रो मार्गिका ९ चे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. दहिसर ते सुभाषचंद्र बोसपर्यंत टप्पा-१ आणि पुढील टप्प्यात उत्तनपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो मार्ग आणि कारशेडचे काम केले जाणार आहे

मेट्रो मार्गिकेच्या मूळ मार्गावर स्थानिक नागरिकांची घरे बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध असल्याने त्यावर पुढील महिन्यात एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शहराच्या मुख्य मार्गावर मेट्रो रेल्वेखाली तीन उड्डाणपुल तयार करण्यात येत आहेत. यातील अन्य दोन पुलांचे काम केले जात असून दुसऱ्या पुलाचे लोकार्पण येत्या १९ फेब्रुवारीला केले जाणार आहे.