ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला यावर्षी मंजुरी मिळणार

पंतप्रधानांच्या पहिल्या १०० कामांच्या यादीत समावेश

आनंद कांबळे/ठाणे

ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो- ४ मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शंभर कामांमध्ये स्थान मिळाले असून यावर्षी त्या कामाला मंजुरी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढणाऱ्या ठाणेकरांना ठाणे परिवहन सेवा अपुरी पडत आहे, त्यामुळे अंतर्गत मेट्रोचा पर्याय तयार करण्यात आला होता, परंतु मागील अनेक वर्षे हा प्रस्ताव रखडला होता. ठाणे महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या ओळखीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांना या कामाचे महत्व पटवून दिले असून आता अंतिम मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आहेत. त्यांच्या पहिल्या शंभर प्रकल्पामध्ये ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोचा समावेश असून त्याला पंतप्रधान मोदी मंजुरी देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र वर्तुळाकार मेट्रो हा अधिक खर्चिक असल्याचे सांगत केंद्राने अंतर्गत मेट्रोऐवजी एलआरटी प्रकल्प राबवण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला केल्या होत्या. वर्तुळाकार मेट्रो हा प्रकल्प १३ हजार कोटींचा होता तर एलआरटी प्रकल्पाची किंमत ही ७,१६५ कोटींच्या घरात होती. त्यामुळे एलआरटीमुळे सुमारे पाच हजार कोटींची बचत होणार होती. तसा प्रस्तावही पालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता एलआरटी प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत केंद्राने नोंदवल्याने आता केंद्राच्या सूचनेनंतर पुन्हा वर्तुळाकार मेट्रोचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

एकूण २९ किमी लांबीचा हा मार्ग असून तीन किमीपर्यंतचा मार्ग हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर १३ रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवीन विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक येथून या वर्तुळाकार मेट्रोची सुरुवात होणार आहे. वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी आणि ठाणे स्टेशन असा मेट्रोचा मार्ग होता. त्यावेळी दोन स्थानके भुयारी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र वर्तुळाकार मेट्रोचे काम आता महामेट्रोच्या ऐवजी एमएमआरडी करणार आहे. २ जानेवारी रोजी ठाणे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात एक बैठकही घेतली होती. तर हे काम एमएमआरडीएकडे देण्याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला पत्र देखिल दिले होते. शासन स्तरावर या पत्राचा पाठपुरावा महापालिका प्रशासनातील अधिकारी करत होते परंतु ठाणे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिले आहे. दिल्ली येथिल अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा केला असून केंद्र सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. त्यास पंतप्रधान श्री. मोदी यांची मंजुरी मिळाल्यावर या कामाला सुरुवात होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंजुरी मिळाल्यावर जमिन हस्तांतरण करणे, विस्थापितांचे पुनर्वसन करणे ही कामे करावी लागणार असून या प्रकल्पाचा १०टक्के आर्थिक भार महापालिकेला उचलावा लागणार असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रकल्पातील बाधितांना न्याय मिळणार
वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पात एकूण १८ इमारती बाधित होत असून तीन इमारतींचे प्रस्ताव हे ठाणे महापालिकेकडे आले आहेत. या प्रकल्पात कोणावरही अन्याय होणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वर्तुळाकार मेट्रोची प्रस्तावित स्थानके
वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी, ठाणे स्टेशन