नवी मुंबई: मेट्रो गाड्यांच्या नियमित देखभालीकरिता, सिडकोतर्फे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवर धावणाऱ्या मेट्रो सेवांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला असून त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक 11 मे 2025 पासून अंमलात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बेलापूर मेट्रो स्थानक आणि पेंधर मेट्रो स्थानक येथून सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो रवाना होईल. तर शेवटची मेट्रो फेरी बेलापूर मेट्रो स्थानक येथून रात्री 10 वाजता व पेंधर मेट्रो स्थानक येथून रात्री 9.45 वाजता होणार आहे.
या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध असणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रो सेवा उपलब्ध असणार आहे.