मे अखेरीस कासारवडवली उड्डाणपूल होणार खुला

सुट्टीच्या दिवसांत पुलाखाली दोन टप्प्यात काम

ठाणे : ठाणेकरांसाठी संवेदनशील विषय ठरलेला कासारवडवली उड्डाणपूल मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीस वाहतुकीसाठी खुला होण्याच्या दृष्टीने कामाला वेग आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

ठाणेकरांना अंतर्गत वाहतुकीसाठी पुलाखालील मार्ग मोकळा व्हावा यासाठी आगामी सलग सुट्ट्यांचा काळ निवडण्यात आला आहे. त्यानुसार ३० आणि ३१ मार्चला मेट्रोने साईड पट्टीचे तर पाच व सहा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कासारवडवलीची आणि घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे चार दिवस महत्वाचे ठरणार आहेत.

घोडबंदर महामार्ग हा जड-अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. जेएनपीटी बंदराकडून हजारोंच्या संख्येने कंटेनर वाहून नेणार्‍या जड-अवजड वाहनांची वाहतूक होत असते. शिवाय या मार्गावर मोठ्या प्रमाणात मेट्रो, उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे हा महामार्ग कायमच वाहतूक कोंडी करणारा ठरत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कासारवडवली भागात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे या मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली हा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे सध्या या परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आता उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

जूनपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असून ठाण्यातून भाईंदर मार्गे पुढे जाणार्‍यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान या कामासाठी वाहतूक विभागाने उड्डाणपूल परिसरातील वाहतूक वळवून ती घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांवर आणली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहन कोंडी होत आहे.
ही कोंडी फोडण्यासाठी कासारवडवली उड्डाणपुलाला समांतर असलेल्या मेट्रोला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अख्यारितील कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आाले आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या अखेरीला गुढीपाडवा आणि रमजान या ३० आणि ३१ तारखेला मेट्रोने पिलरला साईड पट्टी बसवयणचे काम पूर्ण करायचे आहेत. तर पाच आणि सहा एप्रिल शनिवार, रविवार यासुट्टीच्या दिवशी सार्वजनिक विभागाने येथील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. हे काम फत्ते झाल्यास कासारवडवली परिसरातील रहिवाशांना अंतर्गत वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच घोडबंदर मार्गावर वळवलेली वाहतूक पूर्ववत होण्यासही मदत मिळणार आहे.