ठाणे : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचारी आस्थापना, कर्मचाऱ्यांचे वेतन, सफाई कर्मचारी भरती, त्यांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
दरम्यान ठाणे महापालिकेच्यातीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज महापालिका भवनातील अरविंद पेंडसे सभागृहामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, विशेष कार्यकारी अधिकारी वीरेंद्र नाथ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. भीमराव जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, कार्मिक अधिकारी जी.जी.गोदापुरे आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कर्मचारी आस्थापना, कर्मचाऱ्यांचे वेतन, सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदीबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सविस्तर माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्याना माहिती दिली.
दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. ठाणे महापालिकेच्यातीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.