आमदार निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारचे स्पष्टीकरण
ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प हा जनतेच्या अपेक्षांनुसार पूर्ण केला जाईल. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज आमदार निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर दिले.
ठाणे शहरातून जाणाऱ्या नियोजित भूमिगत अंतर्गत मेट्रोमुळे नौपाड्यातील ५० हून अधिक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या प्रश्नावर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी आज चर्चेला आली. या संदर्भात नौपाड्यातील रहिवाशांनी आज केलेल्या आंदोलनाकडे आमदार डावखरे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. यापूर्वीच्या पावसाळी अधिवेशनातही आमदार डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता.
ठाणे शहरात मेट्रोचा मार्ग तीन किलोमीटर भूमिगत आहे. त्यामुळे जुने ठाणे म्हणजे नौपाड्यातील इमारतींचा पुनर्विकासासाठी परवानगी मिळत नाही. त्यामुळे रहिवाशी अस्वस्थ आहेत. संबंधित मार्ग ओव्हरहेड नेल्यास वेगाने पूर्ण होऊन खर्चही कमी होईल. त्यामुळे राज्य सरकार ओव्हरहेड मार्ग नेणार आहे का, पुनर्विकासासाठी एनओसी देणार का, असा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला. त्याला राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
अंतर्गत मेट्रोचा मार्ग ओव्हरहेड नेण्याबाबत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार निरंजन डावखरे यांनी चर्चा केली आहे. त्यानुसार या भागातील जनतेच्या अपेक्षा विचारात घेऊनच प्रकल्प पूर्ण केला जाईल. तसेच हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांत इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्याबाबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री श्री. सामंत यांनी दिले.