आर्ट्स फेस्टिव्हलसाठी मीरा-भाईंदर होऊ लागले सज्ज

दिग्ग्ज कलाकार होणार सहभागी

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील हजारो कलाप्रेमी नागरिक ज्या फेस्टिव्हलची वाट पाहत आहेत त्या ‘संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’चे यंदा चार दिवस आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १२ डिसेंबर दरम्यान हा भव्य दिव्य कला महोत्सव होणार असून दिग्ग्ज कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

चार दिवसात किमान दोन लाख लोक या महोत्सवाला भेट देणार असून त्याची तयारी जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये प्रवेश मोफत मिळणार आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, कवी कुमार विश्वास हे यंदाचे आकर्षण असणार असून त्यांचे ‘लाईव्ह’ कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल होणार आहे. हे आर्ट फेस्टिव्हल म्हणजे मीरा-भाईंदर शहराचे कला-संस्कृती वैभव आहे. ‘विकासकामे करण्याबरोबरच शहरातील नागरिकांना कला, संस्कृती, साहित्य विषयक मेजवानी देणे तसे वातावरण तयार करणे हे पण माझे लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे. यासाठी यंदा मोठ्या जल्लोषात हे मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल होणार असून दररोज किमान ६० ते ७० हजार मीरा भाईंदरकर नागरिक या फेस्टिव्हलला भेट देतील, अशी तयारी आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरारोड, मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून २ डिसेम्बरपासून फेस्टिव्हल प्रवेशासाठी मोफत पास वाटले जाणार आहेत.

मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हलसाठी संपूर्ण मैदान सजवले जाणार आहे. फेस्टिव्हलचे आकर्षक प्रवेशद्वार, चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन, प्रत्यक्ष रांगोळी काढून त्याचे प्रदर्शन, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन असणार आहे. देश-विदेशातील प्रसिद्ध चित्रकारांची जुनी चित्रे प्रदर्शनात पाहता येणार असून चित्र प्रदर्शनाचे एक मोठे दालन असेल. तसेच लहान मुलासाठी ‘गेम झोन’, खाद्यप्रेमींसाठी फूड स्टॉल असणार आहेत.

शंकर महादेवन यांच्या गाण्यांचा कार्यक्रम शुक्रवार ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ शनिवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, राजस्थान व गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेले गायक छोटू सिंग रावणा व सोनू सिसोदिया यांच्या गाण्याचा कार्यक्रम रविवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तर प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांचा ‘ इंडियन हिंदी पोएट’ हा कार्यक्रम १२ डिसेंबर रोजी होणार आहे.