भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात दिल्ली तसेच मुंबईच्या धर्तीवर धूळ नियंत्रण यंत्रे बसवण्याचे काम महापालिकेने सुरू आहे. या यंत्रांद्वारे आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील २५ मायक्रॉन आकाराचे दूषित कण शोषले जाणार आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदरवासियांना शुद्ध हवा उपलब्ध होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी ही सात यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला असून दिल्लीच्याच कंपनीकडून सर्व यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत.
महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषण देखील वाढत चालले आहे. भविष्यकाळाचा विचार करून महापालिकेने अत्याधुनिक यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या यंत्राद्वारे हवेतील सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण नियंत्रित होणार आहे. या यंत्राची १०० मीटरपर्यंत पाणी शिंपडण्याची क्षमता आहे. त्यामुळे हवेतील छोटे छोटे कण जमिनीवर पडले जातात व हवा शुद्ध होते. याशिवाय उत्तन डम्पिंग ग्राऊंडमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही सदर यंत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात प्रदूषण वाढवणारे ‘१४ हॉट स्पॉट्स’ निवडण्यात आले आहेत. यामध्ये काशिमीरा नाका, सुभाषचंद्र बोस मैदान, गोल्डन नेस्ट सर्कल, मीरा रोड, पेणकरपाडा, इंद्रलोक, नवघर अशा १४ भागांचा समावेश करण्यात आला आहे. या भागातील वाहतूककोंडी आणि वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या हॉट स्पॉट्सवर धूळ नियंत्रण यंत्रांच्या मदतीने दूषित हवा शुद्ध केली जाणार आहे.