मीरा-भाईंदर: मुख्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. प्रमोद पडवळ

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरप्पा तिपन्ना दुधभातेला लाच स्वीकारताना अटक झाल्यानंतर रिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रमोद पडवळ यांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सध्या माता व बालकल्याण विभाग आहे.
मीरा-भाईंदर शहरात नागरिकांना जन्म व मृत्यूचे दाखले जलद व जवळच मिळावे म्हणून महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रभाग स्तरावरच जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र उभारले आहे. अशा दाखल्यांमध्ये दुरुस्ती अथवा बदल करावयाचे असल्यास त्याबाबतचे अधिकार हे महापालिका मुख्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी केंद्राकडे दिले आहेत. मात्र ३१ जुलै रोजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दुधभाते यांना लाच घेताना अटक करण्यात आल्याने दहा दिवसांपासून या केंद्राचे कामकाज बंद असल्याची बाब समोर आली आहे.
प्रामुख्याने जन्म-मृत्यू दाखल्यात बदल केल्यास त्यावर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. परंतु पालिकेत अद्याप दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यामुळे कामकाजच बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती.
याबाबतचे तीव्र पडसाद प्रसिध्दी माध्यमातून उमटल्याने उप आयुक्त रवि पवार यांनी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याकडे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.