ठाण्यात ४८ लाखांची एमडी पावडर जप्त; राजस्थानी तरुणाला अटक

ठाणे: एम.डी. ही अंमली पदार्थ असलेली पावडर बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आलेल्या घेवाराम पटेल (२१) या राजस्थानी तरुणाला ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २४२.०९ ग्रॅम वजनाचा एमडी पावडरचा मुद्देमाल जप्त केला असून त्याची किंमत ४८ लाख ४१ हजार ८०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे शहर परिसरात बाहेर राज्यातील ड्रग्ज तस्कारांकडून अंमली पदार्थ विक्री होत असल्याने त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

याचदरम्यान पोलीस हवालदार अजय रावसाहेब सपकाळ यांना गायमुख येथे काही जण एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून १६ एप्रिल रोजी घेवाराम पटेल या तरुणाला अटक केली. तो न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे ठाणे शहर परिसरात ड्रग्ज तस्करी करण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणलेला असुन या गुन्हयात आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने या गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम करत आहेत.