डोंबिवलीचा एमडी किंग साथीदारांसह अटकेत; ड्रग्ज जप्त

ठाणे : डोंबिवली परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका ड्रग्ज पेडलर्सला त्याच्या दोघा साथीदारांसह ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

प्रवीण चौधरी उर्फ चुंन्नी (54) रिक्षाचालक, खालचापाडा, डोंबिवली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो स्वतःला डोंबिवलीचा एमडी किंग असे बिरुद लावून मिरवत होता. या स्वयंघोषित एमडी किंगची माहिती मिळताच त्यास पोलिसांनी त्याच्या दोघा साथीदारांसह बेड्या ठोकल्या.

अटकेतल्या आरोपीकडून सात लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली परिसरात एक जण एमडी हे घातक ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून 5 मार्च 2024 रोजी ड्रग्ज विक्रेता प्रवीण अंकुश चव्हाण (42) कुंभारखान पाडा, डोंबिवली यास अटक केली होती. यावेळी त्याच्याकडे चौदा लाखाचे 140 ग्रॅम वजनाचे एमडी हे ड्रग्ज आढळून आले होते. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

आरोपीने हे अमली पदार्थ कुठून आणले, याबाबत पोलीस अधिक तपास करीत असतांना डोंबिवलीत राहणारा इसम प्रवीण चौधरी उर्फ चुन्नी हा स्वतःला डोंबिवलीचा एमडी किंग म्हणून मिरवत एमडी व गांजा विक्री करत असतो. त्यानेच एमडी विक्रीसाठी दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी त्यास 27 जुलै 2024 रोजी डोंबिवलीतून विनोद पटवा (31) रा.डोंबिवली व सशांक व्यंकटा नरसिमहा देवरा उर्फ अँप्पी (35) रा. कोपरगाव, डोंबिवली या त्याच्या दोघा साथीदारांसह अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यात सात लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी ड्रग्ज व एक रिक्षा जप्त केली आहे. हा स्वयंघोषित एमडी किंग रिक्षातून ड्रग्ज विक्री करत असे. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो दर अर्ध्या तासाने आपल्या रिक्षात बसून ड्रग्ज विक्री करण्याचे ठिकाण बदलत असे.

त्याच्यावर यापूर्वी चरस विक्रीचा गुन्हा दाखल असून तो त्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ड्रग्ज विक्री करण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती ठाणे अमली विरोधी पथकाच्या पोलीस पथकाने दिली.