कल्याणमध्ये सात लाखाचे एमडी ड्रग जप्त

अटक आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश

कल्याण : कल्याण झोन ३ पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात कंबर कसली असून कल्याण कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई करत सात लाख १५ हजार रुपयांच्या एमडी ड्ग्जसह चार आरोपींना अटक केली आहे. यात एका नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश आहे.

कल्याण पूर्वेतील १०० फूटी रोडवर नाकाबंदी दरम्यान एक रिक्षा पोलिसांना पाहून पळवली जात असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पाठलाग करत या रिक्षातील दोन तरुणांची अंगझडती करत तपास केला असता त्यांच्याकडे ५.६ ग्राम वजनाचा ३३,६०० रुपयांचे एमडी हा मादक पदार्थ सापडला. त्या दोघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबईतील चुकवू इमेका जोसेफ इमेका या ४२ वर्षीय व्यक्तीकडून हा अमली पदार्थ खरेदी केला असून कल्याण पूर्वेत त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडील २७९ ग्राम वजनाचा पाच लाख ५८ हजार रुपये किमतीचा एमडी जप्त केला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

याच दरम्यान खडकपाडा पोलिसांनी आंबीवली परिसरात केलेल्या कारवाईत फिजा इराणी या महिलेकडे ३४ ग्राम एमडी जप्त केले. या अमली पदार्थांची बाजारातील किमत ६८ हजार रुपये इतकी असून या अमली पदार्थांची एकत्रित रक्कम सात लाख १५ हजार रुपये इतकी आहे. कल्याणात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याण एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली असून पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.