* कामे मुदतीत संपवण्यात यंत्रणा अपयशी
* आपत्कालीन नियंत्रण कक्ष मात्र सुरू
ठाणे : पावसाळापूर्व कामे संपवण्याची मुदत उलटूनही ठाण्यात एमएमआरडीए आणि महापालिकेची रस्ते, मलनिस्सारण, मेट्रो आदी कामे सुरूच आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ही कामे मुदतीत संपवण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले असले तरी आपत्कालीन नियंत्रण कक्ष मात्र १ जूनलाच सुरू करण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्कालिन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा कक्ष १ जून पासून कार्यरत झाला असून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यरत राहणार आहे. मुंबईसह ठाणे महानगरपालिकासह भिवंडी- निजामपूर, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या व अन्यत्र शहरांमध्ये एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. येत्या पावसाळ्यात या शहरांतील विविध प्रकल्पांची कामे सुरुच राहणार असल्यामुळे त्याचा त्रास स्थानिक रहिवासी, खासगी आणि विविध वाहतूक सेवांना सोसावा लागणार आहे. या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. या नियंत्रण कक्षात आलेल्या २४ तास विविध तक्रारी संबंधित पाठपुरावा करण्यात मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मध्य रेल्वे आदी विविध संस्थांच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे.
प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी अनेक वाहनांची व त्यांची गैरसोय कमी व्हावी या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पावसाळ्यात झाडांची पडझड, पाणी तुंबणे, अपघात वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षांकडून नागरिकांना मदत मिळू शकेल. नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील.
एमएमआरडीएच्या क्षेत्रात असलेल्या सर्व संबंधित कंत्राटदारांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकल्पांच्या ठिकाणी सुयोग्य दुरुस्त्या करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी साचून राहणा-या, ओल्या-सुक्या जमा होणा-या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावणे आदी सूचनांचा समावेश आहे. ज्या परिसरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही आणि तसेच ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचण्याची जास्त शक्यता आहे, तेथे अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले आहेत, अशी माहिती ‘एमएमआरडीए’चे सह महानगर आयुक्त राहुल कर्डिले यांनी दिली.
ठाणे पालिका, एमएमआरडीएने रेटली कामे
ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए या यंत्रणांच्या कामांची मुदत ३१ मेपर्यंतच होती. ती उलटून गेली असली तरीही रस्त्यांचे खोदकाम, मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे, महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, मेट्रोची विविध कामे आदी कामे थांबवण्याचे नाव या महत्वाच्या यंत्रणा घेत नाहीत. पावसाचे आगमन अजून झाले नसल्याचे कारण पुढे करत कामे रेटत आहेत. वास्तविक ठाणे वाहतूक पोलिसांनी ही कामे ३१ मेपूर्वीच थांबवण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. ‘वरुण राजाची कृपादृष्टी असल्यामुळे या यंत्रणांनी कामे चालूच ठेवली आहेत, असे वाहतूक अधिका-याने सांगितले. पाऊस सुरु झाल्यावर त्यांची सर्व कामे थांबवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.