‘FIPRESCI-India’ चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ अव्वल स्थानी!

जिओ स्टुडिओजचा आगामी चित्रपट ‘गोदावरी’ जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उत्तमरित्या उमटवताना दिसत आहे. ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने व प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे.

‘गोदावरी’ चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे एका नदीजवळ त्याला मिळणार आहेत, ज्या नदीचा तो अनेक दिवस तिरस्कार करत होता. शेवटी तीच नदी त्याच्या आयुष्यातील प्रश्न सोडवते का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, “फ्रिप्रेस्की हा चित्रपट समीक्षकांचा आंतरराष्ट्रीय महासंघ आहे. २०२१ मधील भारतातील दहा सर्वोत्कृष्ट फिचर फिल्ममध्ये या चित्रपटाचा सहभाग होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘गोदावरी’ हा चित्रपट आम्ही करोना महामारीच्या काळात अगदी कमी गोष्टींचा वापर करून बनवला आणि अभिमान वाटतो की आज हा चित्रपट जागतिक प्रवास करत आहे. जिओ स्टुडिओमध्ये अतिशय उत्तम लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून लवकरच आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. पवित्र गोदावरीची कथा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”

‘गोदावरी’ चित्रपटाला अनेक पुरस्करांनी गौरवण्यात आले आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं इफ्फी २०२१ मध्ये सुद्धा आपले सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘सिल्वर पिकॉक’ पुरस्कार पटकवला असून दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्वर पिकॉक’ आणि ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ पटकावला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटातील संगीत विभागासाठी ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांना सर्वोत्कृष्ट संगीत विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविले आहे. या चित्रपटाचा वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमियर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये एशिया पॅसिफिक प्रीमियर दाखवण्यात आला.