शाहरुखच्या मुलावर कारवाई केल्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणी आर्यन खानला येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. पतीच्या या कामगिरीविषयी बोलताना क्रांतीने कौतुक केले आहे.

क्रांतीने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पती समीर वानखेडे यांच्या कामगिरीचे तिने कौतुक केले आहे. ‘एक पत्नी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. ते फार मेहनती आहेत. त्यांनी या पूर्वीही अशी अनेक प्रकरणे हाताळली आहेत. पण हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असल्यामुळे चर्चा सुरु आहेत’ असे क्रांती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा समीर एखादे प्रकरण हाताळत असतात तेव्हा मी त्यांना त्यांचा पूर्ण वेळ देते. मी कधीच त्यांना काय सुरु आहे किंवा कसे सुरु आहे असे प्रश्न विचारत नाही. मी घरातील सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते, जेणे करुन त्यांना त्यांच्या कामाकडे लक्ष देता येईल. कधीकधी समीर कामात इतके व्यग्र असतात की मोजून २ तास झोप घेतात. कामासंबंधी फोन सुरु असताना मी कधीही त्यांना कोणते प्रश्न विचारत नाही. ते त्यांच्या सिक्रेट ऑपरेशनवर काम करत असतात. कुटुंबीयांना ते कधीच याबाबत माहिती देत नाहीत. मी त्यांच्या कामाचा आदर करते आणि याबाबत कधीच तक्रार करत नाही.’

कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे ऑफिसर आहेत. यापूर्वीही समीर यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाडी टाकल्या आहेत. विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यासारख्या दिग्गज सेलिब्रेंटींच्या घरावर समीर वानखेडे यांनी धाडी टाकल्या आहेत. २०१३ साली बेकायदेशीर पद्धतीने परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक मिका सिंग याला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाईही समीर यांनीच केली होती. समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली झाली होती. कस्टममधून त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनबीसी)मध्ये करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात समीर वानखेडे यांनी १७ हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज पकडलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपासही समीर यांच्याकडे सोपवण्यात आला.