उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी मनिषा आव्हाळे

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावर मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज आयुक्त पदाचा पदभार घेतला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावर महिला आयएएस अधिकारी यांची नियुक्ती झाल्याने शहर विकासावर त्या अधिक भर देतील अशा अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावर चार महिन्यांपूर्वी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी या चार महिन्यात शहर विकासावर अधिक भर दिला होता. परंतु त्यांची अचानक मंत्रालयात बदली झाली असून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव म्हणुन रुजू झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचे आयुक्तपद रिक्त झाले होते. दरम्यान प्रभारी आयुक्त म्हणून जमीर लेंगरेकर यांच्याकडे पदभार होता. मात्र काल नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्त केल्याचे पत्र काढले आहे.

दरम्यान आज सकाळी १० वाजताच त्यांनी महापालिकेत येऊन आयुक्त पदाचा पदभार घेतला. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी त्यांचे पुस्तके व फुलगुच्छ देऊन स्वागत केले.