ठाणे महापालिकेचा प्रस्ताव तयार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात आपली हक्काची घरे देऊन रेंटलमध्ये राहत असलेल्या पाच हजारहून अधिक सदनिकांमधील रहिवाशांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा ११ व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव देखिल प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून स्वतः महापालिका आयुक्तही यासाठी आग्रही असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात सहा व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर निधी अभावी व्यवस्थापकांचे पगार होऊ न शकल्याने अखेर व्यवस्थापकांना काम थांबवावे लागले होते.
धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या किंवा रस्ता रुंदीकरण अथवा पालिकेच्या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात रेंटल हाऊसची घरे भाड्याने देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून प्रति महिना दोन हजार रुपये भाडे आकारले जाते. मात्र काही ठिकाणी रेंटल हाऊसमध्ये असुविधा असल्याने नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. काही इमारतींच्या लिफ्ट देखील व्यवस्थित काम करत नाहीत. तर काही ठिकाणी सांडपाणी देखील अक्षरशः इमारतींच्या आवारात वाहत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. रेंटलच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये यासाठी या इमारतींमध्ये व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. तत्कालीन पालिका आयुक्तांच्या आदेशाने सर्व रेंटलच्या इमारतींमध्ये एकूण सहा व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी त्यांना प्रति महिना १५ हजार मानधनावर कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र निधीअभावी या सर्व व्यवस्थापकांचे मानधन रखडले आणि व्यवस्थापकांना काम थांबवावे लागले.
आता पुन्हा नव्याने ११ व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पदे स्थावर मालमत्ता विभागाकडून न भरता आस्थापना विभागाकडून भरली जाणार आहे. यासाठी महापालिकेने नवा प्रस्ताव देखील तयार केला असून यासाठी नवीन पदनिर्मिती करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. या व्यव्सस्थापकांच्या नियुक्त्या झाल्यास रेंटलमधील नागरिकांना काही प्रमाणात का होईना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेंटलच्या एकूण १९ इमारती असून त्यात ५,६७० सदनिका आहेत. एक्मे रेंटल हाऊसिंग (खेवरा सर्कल) येथे एक इमारत असून दोस्ती इम्पेरिया रेंटल हाऊसिंग (मानपाडा) येथे पाच, काबूर लोढा रेंटल हाऊसिंग (बाळकूम) येथे एक, छेडा रेंटल हाऊसिंग (नौपाडा) येथे एक, दोस्ती रेंटल हाऊसिंग (वर्तकनगर) येथे चार, मॅजिस्टीक रेंटल हाऊसिंग (उथळसर) येथे एक, आकृती रेंटल हाऊसिंग (वर्तकनगर ) येथे एक, दोस्ती रेंटल हाऊसिंग (मुंब्रा) येथे दोन, भाईंदरपाडा रेंटल (माजिवडा) एक आणि हाजूरी रेंटल (दीपमोह) येथे एक इमारत अशा १९ रेंटल इमारती ठाण्यात आहेत.