‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राचं नवं गाणं प्रदर्शित, ‘नाते नव्याने’ प्रेक्षकांच्या भेटीला!

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकचं ‘नाते नव्याने’ हे गाणं प्रदर्शित झालं असून एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शुक्रवारी १७ जून २०२२ रोजी या गाण्याचा शुभारंभ झाला. त्या आधी बुधवारी या गाण्याचे ट्रेलर आणि टीझर प्रकाशित झाले असून त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे गाणे शुक्रवारी प्लाझा सिनेमा येथे १७ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदर्शित केले. या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो अत्यंत देखणा झाला आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे उपस्थित होते.

या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडीओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एलएलपीचे संजय छाब्रिया म्हणाले, “आम्ही या गाण्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून एक अनोखा असा प्रयोग मराठीमध्ये केला आहे. गाण्याचा हा व्हिडीओ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात जाणार आहे. अशाप्रकारचे अनेक प्रयोग मराठीमध्ये करण्यास आम्ही बांधील आहोत. आमची पूर्ण खात्री आहे की, आमचा हा प्रयोग मराठी प्रेक्षकांना आमच्या याधीच्या प्रयोगांप्रमाणेच भावेल. याआधीच्या आमच्या प्रयोगांना रसिकांना उत्तम प्रतिसाद दिला होता.”

एव्हरेस्ट म्युझिकने आपल्या युट्युब वाहिनीवर कित्येक आघाडीच्या कलाकारांची लोकप्रिय गाणी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात सुरेश वाडकर, सुदेश भोसले, अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अजय-अतुल आदींचा समावेश आहे. त्यातील काही गाण्यांना तर तब्बल ६० दशलक्षांच्या घरात प्रेक्षकसंख्या मिळाली आहे. कुठल्याही मराठी युट्यूब वाहिनीसाठी हा एक विक्रम आहे.