मालविका बनसोड हिने पटकावले जागतिक स्तरावरील रौप्य पदक

ठाणे : बॅडमिंटन क्रीडा विश्वात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एचएसबीसी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आयोजित वर्ल्ड सुपर ३०० या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याची आणि आता संपूर्ण भारत देशात अग्रेसर असणारी ठाण्याची मालविका बनसोड हिने पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील रौप्य पदक पटकावण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.

यापूर्वी गेल्याच महिन्यात पार पडलेल्या विक्टर चायना ओपन एच एस बी सी बी डब्ल्यू एफ वर्ल्ड सुपर 1000 इंटरनॅशनल टूर्नामेंट या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिने जागतिक क्रमवारीत ५व्या आणि २६ व्या असणाऱ्या खेळाडूंचा पराभव करून कांस्यपदक पटकावले होते. सलग दुसऱ्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत एका मागोमाग एक अशी दोन पदके पटकावून तिने जागतिक क्रमवारीत गरुड झेप घेतली आहे. मालविका बनसोड ही जागतिक क्रमवारीत आत्ता ३४ व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड सुपर थ्री हंड्रेड या मानाच्या स्पर्धेत संपूर्ण बॅडमिंटन क्रीडा विश्वातून केवळ दिग्गज आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या खेळाडूंनाच सहभाग घेता येतो. या स्पर्धेत मालविकाला सहावे मानांकन होते.

राऊंड ऑफ 32 मध्ये मालविका हीने बल्गेरियाच्या रिस्तोमीरा पोपोवसका हिचा 21-6, 21-17 असा सहज पराभव करून या स्पर्धेतील आपले मानांकन सिद्ध केले आणि सुवर्णपदक पटकावण्याची महत्त्वकांक्षा जाहीर केली.

पुढील फेरीत डेन्मार्क देशाच्या इरीना अँडरसन या खेळाडूचा 21-13,21-16 असा सरळ सेट मध्ये पराभव केला आणि उपउपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या गुयन लीन या बलाढ्य खेळाडूचा मालविका ने 21-15, 21-17 इतक्या सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात मालविकाने डेन्मार्कच्या जुली जाकोबसेन हिचा दीर्घकाळ चाललेल्या लढतीत 23-21 आणि 21-18 असा पराभव केला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.

या स्पर्धेत अंतिम फेरीतील सामना हा जागतिक क्रमवारीत 34 व्या आणि 36 व्या असणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये होता अंतिम फेरीत डनमार्कच्या मिया ब्लिचफिल्ड या खेळाडू कडून मालविकाला पराभव पत्करावा लागला. सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याने मालविकाचा संपूर्ण भारत देशात आपल्या गाजावाजा होत आहे.

ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मध्ये तिच्या खेळीवर विशिष्ट प्रगत प्रशिक्षण घेण्याचे काम जोमाने चालू आहे आणि याचीच फलश्रुती त्याचप्रमाणे आमच्या सर्व प्रशिक्षकांच्या टीमच्या कष्टाचे चीज म्हणजेच मालविका हिने पटकावलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे लागोपाठ दुसरे रौप्य पदक आहे असे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी नमूद केले. तिच्या या यशात ठाणे बॅडमिंटन अकॅडमी श्री. वाड, मयूर घाटणेकर अक्षय देवलकर, विघ्नेश देवळेकर यांच्या समवेत संपूर्ण टीमचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते.

तिच्या जर्मनीमधील यशाबद्दल तिचा खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये हृद्य सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास प्रख्यात कॉर्पोरेट मार्केटिंग तज्ञ सलील वैद्य, एचडीएफसी कंपनीचे ह्यूमन रिसोर्स विभागाचे प्रमुख अलोक शिवपूरकर तसेच ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद आपटे हे उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कौतुक केले.