मालवणी कट्ट्याचा झणझणीत विजय, अंतिम फेरीत धडक
ठाणे: अष्टपैलू ऋषिकेश पवार याच्या दमदार ६८ धावा आणि २७ धावांच्या बदल्यात घेतलेले चार बळी याच्या जोरावर मालवण कट्टा संघाने विहंग इंटरप्रायझेस संघावर १०१ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या क गटात झालेल्या सामन्यात मालवण कट्ट्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. हृषिकेश पवार, अजय बोदडे, निश्चय नवले आणि ओंकार नंदा यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे मालवण कट्ट्याला पाच गड्यांच्या बदल्यात २६९ धावांचा डोंगर उभा केला. अष्टपैलू ऋषिकेश पवार याने ६५ चेंडूंत ६८ धावा केल्या. यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ओंकार नंदा याने २४ चेंडूंत नाबाद ५१ धावा फटकावल्या. यात पाच षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. अजय बोदडे याने ५१ तर निश्चय नवले याने नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. मालवण कट्ट्याने ३५ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावा केल्या. विहंग इंटरप्रायझेसच्या तन्मय कदम याने दोन तर चिराग मोडक, रोहित सुवर्णा आणि संदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
मालवण कट्ट्याने दिलेले आव्हान पार करताना विहंगला १६८ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यातही संघाला सर्व फलंदाज खर्ची घालावे लागले. अर्पित धाडवे याच्या ५१ आणि मंदार चौधरी याच्या ३२ धावा वगळता एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. मालवण कट्ट्याच्या ऋषिकेश पवार याने सात षटकांत २७ धावा देत चार गडी बाद केले. तर तनिष पाटकर, अजय सिंघम आणि अमित राठोड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उपांत्य फेरीत दमदार विजयाची नोंद केल्याने मालवण कट्ट्याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.