ठाणे: कोकण ग्रामविकास मंडळातर्फे २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत “मालवणी महोत्सव -२०२४” चे आयोजन शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने दशावतारी नाटक, डबलबारी, भारूड आणि खेळ पैठणीचा अशी विविधांगी अस्सल मनोरंजनाची मेजवानी १० दिवस मिळणार आहे, अशी माहिती आयोजक तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कलासंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतुने गेली २५ वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सव – २०२४ चे उद्घाटन होणार असून महोत्सवाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीयमंत्री नारायण राणे, ना. कपिल पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मुंबई बँकेचे अध्यक्ष आ.प्रविण दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत.
मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे रेखीव मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असून महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा कृष्णाई उळेकर यांचे श्रवणीय ‘भारूड’ तसेच ख्यातनाम व्याख्याते सोपान कनेरकर यांचे ‘बाप’ या विषयावर व्याख्यान ; महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
११ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. खेळ पैठणीचा आणि नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे.