येत्या शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम

ठाणे: दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवयास मिळणार आहे.
कोकण ग्रामविकास मंडळातर्फे १० ते १९ जानेवारी या कालावधीत “मालवणी महोत्सव-२०२५” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा होणार असुन महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा” मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शानिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने गेली अनेक वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात. १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
१० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप नेते माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर, आ.निरंजन डावखरे, आ.निलेश राणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत.
मालवणी महोत्सवात एकुण ६० च्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले पहायला मिळणार असुन हे अस्सल कोकणस्थ रेखीव मंदिर भाविक आणि खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण ‘पिंगळा’ हा भारूडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे. महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार आहेत.१९ जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे.