मलेरिया आणि डेंग्यूने ठाणेकर झाले बेजार

एका महिन्यात १५१ रुग्णांची नोंद

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून एका महिन्यातच मलेरियाचे १२३, तर डेंग्यूच्या २८ रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या उथळसर प्रभाग समिती हद्दीत ३२हून जास्त रुग्ण मलेरियाचे आहेत. तर मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या हद्दीत डेंग्यूचे सर्वाधिक सात रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

विविध आजाराच्या रुग्णांनी एकीकडे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तुडुंब भरले असताना दुसरीकडे साथीच्या आजारांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. या आजारांचा विळखा वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाला शहरात रुग्ण किती?संशयित रुग्ण किती? खासगी रुग्णालयात साथीचे रुग्ण किती?तसेच साथीच्या आजारांची खासगी प्रयोगशाळेत परिस्थिती काय आहे? याची आरोग्य केंद्रनिहाय माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

पालिका आयुक्तांनी बुधवारी रक्षाबंधनाच्या दिवशी आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये हा सर्व प्रकार उघड झाला आहे. ही बैठक नियोजित वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होती. बैठक सुरू असताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना के. आणि उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिता हमरजकर यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने आयुक्तांनी त्वरित बैठक थांबवली. दरम्यान, डेटा पुन्हा तयार करून आल्यानंतर आयुक्तांनी संध्याकाळी ५.३० वाजता आढावा घेतला.

शहरात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, कावीळ आणि लेप्टोसारख्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना पालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आयुक्तांनी घेतली आरोग्य विभागाची हजेरी

ठाणे शहरात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाला याचे काहीच गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे. पालिका आयुक्तांनी सुट्टीच्या दिवशी घेतलेल्या बैठकीमध्ये विविध साथीच्या आजारांचे नेमके किती रुग्ण आहेत याचा आकडाच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हता. या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. आजार वाढत असताना आरोग्य विभाग सुस्त कसा यावरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रभाग समितीनिहाय रुग्ण

प्रभाग मलेरिया डेंग्यू

माजिवडा – मानपाडा १६ ७
नौपाडा-कोपरी २१ ४
उथळसर ३१ ०
वर्तकनगर ३ १
लोकमान्य नगर २३ ४
कळवा ६ १
मुंब्रा ५ १
वागळे इस्टेट २६ १
दिवा ० ०
———————————————–
एकूण १२३ २८