खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत सूचना
नवी दिल्ली: सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा विमान प्रवास, देशभरात पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी, ड्रोन, एअर टॅक्सीचा वापर शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करावा, सर्व लहान-मोठ्या विमानतळांवर वायफाय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या महत्वपूर्ण सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक या महत्त्वपूर्ण विधेयकावर खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील चर्चेत भाग घेत वरील महत्वपूर्ण सूचना केल्या.
या विधेयकाद्वारे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय ही नोंदणी आणि डी-नोंदणीसाठी अधिकृत प्राधिकरण म्हणून नियुक्त केली गेली आहे. जे विमान घेणार आहेत ते नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला माहिती देतील, आणि कर्जदार जर चुकले तर, केवळ दोन महिन्यांच्या आत धनको विमान परत घेऊ शकतो. यातून भारतात विमान भाडे तत्वावर देणारी यंत्रणा सक्षम होईल. ज्यामुळे आपल्याला दुबई, सिंगापूर, आयर्लंडसारख्या देशांकडून विमाने भाड्याने घ्यावी लागणार नाहीत. यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर रोजगाराच्या संधी वाढतील आणि आर्थिक गतीला बळ मिळेल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
हवाई सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी एआय आधारित मॉनिटरिंग सिस्टीम आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी नेमणे, प्रवाशांच्या सोयीसाठी लहान-मोठ्या विमानतळांवर वायफाय सुविधा, उत्कृष्ट स्वच्छता सुविधा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना, विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा व्हावा यासाठी भाड्यांवर किंमत मर्यादा लागू करणे, भविष्यातील तंत्रज्ञान जसं की ड्रोन, एअर टॅक्सी यांच्यासाठी स्पष्ट, कठोर आणि व्यावहारिक नियम बनवून त्याचा शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावी उपयोग करणे. पायलट प्रशिक्षणाची सध्या खूप जास्त किंमत असून, आवश्यक साधन संपत्ती कमी आहे. त्यामुळे देशात अधिक दर्जेदार, परवडणारी पायलट ट्रेनिंग सेंटर्स उभारणं ही काळाची गरज आहे, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.
या महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकसभेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानत भारताच्या उड्डाणाला स्थिरतेचे इंजिन, आत्मनिर्भरतेची दिशा आणि युवाशक्तीचं इंधन लाभल्यावर, भारत अजून उंच झेप नक्की घेईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी शेवटी व्यक्त केला.