माजिवडे भागाला अडीच एमएलडी पाणी मिळणार

* ४०० मिमी व्यासाची जलवाहिनी लवकरच कार्यान्वित
* आमदार संजय केळकर यांनी केली पाहणी

ठाणे : माजिवडे गाव आणि परिसराची सध्याची लोकसंख्या आणि भविष्यात वाढणाऱ्या कुटुंबांना पुरेल एवढे पाण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. या भागाला अडीच एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी ४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी नुकतीच करून अधिकाऱ्यांना तातडीने कामे उरकण्याचे निर्देश दिले.

माजिवडे गाव आणि परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांना गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार संजय केळकर यांनी घोडबंदरसह माजिवडे परिसराला पुरेसे पाणी मिळावे यासाठी अतिरिक्त पाणी पुरवठ्याची मागणी तत्कालीन आयुक्तांकडे केली होती.

माजिवडे नाका येथे पाण्याची टाकी असून तिची पाणी साठवण क्षमता २.५ दशलक्ष लिटर आहे. सध्या या परिसराला ३०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना या टाकीत जेमतेम दोन दशलक्ष लिटर पाणी साचते. हे पाणी अपुरे असल्याने नागरिकांना नेहमीच पाणीटंचाई भेडसावत असते.

सध्या या भागात मोठमोठे गृह प्रकल्प उभे राहत असून आगामी काळात आणखी दीड हजार घरे निर्माण होणार आहेत. त्यामुळे सध्याची लोकसंख्या आणि पुढील काळात वाढणारी लोकसंख्या यांना पुरेल एवढे पाणी मिळावे याबाबत आमदार संजय केळकर यांनी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून अतिरिक्त पाण्याची मागणी केली.

त्यानुसार ठाणे-घोडबंदरच्या मुख्य जलवाहिनीवरून ४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. या जलवाहिनीनुळे माजिवडे नाका येथील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरून पाणी समस्या तूर्त सुटणार आहे.

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणी दरम्यान ओवळा-माजिवडा मंडल अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत म्हात्रे, मंडल सरचिटणीस जितेंद्र मढवी, सूरज दळवी, नीलेश पाटील, मत्स्यगंधा पवार, तृप्ती सुर्वे, अमित पाटील, सचिन शिनगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नवीन जलवाहिनीचे काम वेगाने सुरू असून माजिवडे भागातील हजारो कुटुंबांची तहान भागणार आहे. मात्र भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी मिळावे यासाठीही मी प्रयत्नशील असून आणखी एक नवीन पाण्याची टाकी या भागात उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे, अशी माहितीही श्री.केळकर यांनी दिली.