माही ठक्करच्या अष्टपैलू कामगिरीने फोर्ट यंगस्टर क्रिकेट क्लबला धूळ चारली

ठाणे: कर्णधार माही ठक्करचा अष्टपैलू खेळ आणि आयुषी सिंगने फलंदाजीत दिलेल्या तेवढ्याच तोलामोलाच्या साथीमुळे पय्याडे स्पोर्ट्स क्लबने फोर्ट यंगस्टर क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

फोर्ट यंगस्टर क्रिकेट क्लबने दिलेल्या २३० धावांचे लक्ष्य पय्याडे स्पोर्ट्स क्लबने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात २३५ धावा करत पार केले. गोलंदाजी प्रमाणे आक्रमक फलंदाजी करणारी माही ठक्कर स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराची मानकरी ठरली.

मानसी पाटील, हिया पंडित, सन्मया उपाध्याय आणि भूमिका रायने संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. मानसीने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. हिया आणि सन्मयाने प्रत्येकी ३६ आणि भूमीकाने २२ धावा केल्या. माहीने चार, जिया मांडरवडकर आणि श्रध्दा सिंगने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

उत्तरादाखल सुरुवातीला आयुषी सिंगने आणि नंतर माहीने धडाकेबाज अर्धशतके करत फोर्ट यंगस्टरच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. सलामीला आलेल्या आयुषीने ५० चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद ७७ धावा केल्या. माहीने नाबाद ७६ धावांची खेळी करताना ४४ चेंडूत १२ चौकार आणि तीन षटकार मारले. ललिता यादवने २८ आणि भावना सानपने २५ धावा केल्या. वेदिका मगरने दोन आणि अर्धशतक रचणाऱ्या मानसीने एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक: फोर्ट यंगस्टर क्रिकेट क्लब: ३४.३ षटकात सर्वबाद २३० (मानसी पाटील ५७; माही ठक्कर ४/४२) पराभूत विरुद्ध पय्याडे स्पोर्ट्स क्लब: २६.३ षटकात ३ बाद २३५ (आयुषी सिंग नाबाद ७७; वेदिका मगर २/३०)

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : माही ठक्कर (पय्याडे स्पोर्ट्स क्लब).