कल्याण सर करण्यासाठी महायुतीची घोडदौड

महाविकास आघाडीची भिस्त कळवा-मुंब्र्यावर

ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील पदाधिकारी आणि नेत्यांची नाराजी वेळेत दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखिल भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभेला हिरवा कंदील दाखवल्याने शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे जड दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची भिस्त फक्त कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघावर आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण ग्रामिण, कल्याण पूर्व, उल्हासनगर, आणि अंबरनाथ हे सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. ११ लाख १०,९३४ पुरुष आणि नऊ लाख ५७,८९७ महिला असे एकूण २० लाख ६९,५८१ मतदार या मतदारसंघात असून जिल्ह्यातील सर्वात कमी मतदार संख्या असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्याची संख्या दोन लाख ५६,४३१ आहे. विद्यमान खासदार डॉ.शिंदे हे तिसऱ्यांदा या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. त्यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होत आहे.

या मतदार संघातील भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण, आ. गणपत गायकवाड, मनसेचे आ.राजू पाटील आणि खा. डॉ. शिंदे यांच्यातून निवडणुकीपूर्वी विस्तवही जात नव्हता, परंतु मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या सर्वांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. मनसेला युतीसोबत घेण्याची खेळी देखिल खा.डॉ शिंदे यांच्या कामी आल्याने कल्याण ग्रामिण मतदार संघातील त्यांची मतपेटी कायम राहिली आहे.

डोंबिवली, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व या मतदारसंघात भाजपचे तर अंबरनाथ येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्याची जमेची बाजू डॉ.शिंदे यांच्यासाठी आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रीमती दरेकर यांच्यासाठी कळवा-मुंब्रा मतदार संघ हा सुरक्षित असून या मतदार संघातील मताधिक्यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. या लोकसभा मतदार संघातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे. त्याचा फटका दरेकर यांना बसण्याची श्यक्यता आहे.

या लोकसभा मतदारसंघात मनसेचे प्रमुख राज ठाकरे याची १२मे रोजी कळवा येथे तर पंतप्रधान मोदी यांची १५मे रोजी कल्याण येथे जाहीर सभा होणार आहे. याचा फायदा डॉ.शिंदे यांना होणार आहे. उबाठाच्या उमेदवाराकरिता आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत तर पुढील आठवड्यात राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा मुंब्रा येथे रोड शो होणार आहे. त्याचा कितपत फायदा दरेकर यांना होतो हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.