मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला असून एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती असताना सर्वजण मनसेच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले होते. मनसे भाजपसोबत जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होतीच, त्यात आता बंद दाराआड झालेल्या बैठकीची भर पडली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या तिघांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुन्हा मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचे समोर येत आहे. आता भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आणि मनसे ही नवी युती होणार का? ही युती झाली तर काय फॅार्म्युला असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचं लोकसभेत मिशन 45 आहे, त्यासाठी सर्वच पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची रणनीती आहे. त्यात लोकसभेत मनसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसू शकतात.
मनसेच्या निवडणुकीचा इतिहास
पक्षस्थापनेनंतर मनसेनं 2009 साली पहिली लोकसभा निवडणुक लढवली. मनसेनं 2009 साली 13 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती.
त्यानंतर 2014 साली मनसेनं थेट मोदींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेनं आपला एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभा केला नव्हता.
2019 साली राज ठाकरेंनी भूमिका बदलली. राज ठाकरेंनी 2019 साली लाव रे व्हिडीओ ची संकल्पना आणली आणि राज्यातल्या व केद्रसरकावर राज ठाकरेंनी आगपाखड केली. 2019 साली राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुक लढवली नाही.
2024 हे वर्ष निवडणुकांचे आहे, या वर्षात लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्तेचा सोनेरी मुकुट शिरपेचात खोवायला सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. त्यात मनसे आता महायुतीत सामील झाली तर आश्चर्य वाटायला नको.