ठाण्यातील आठ प्रभागांमध्ये महायुतीला मिळाली आघाडी!

पारंपारिक गडांसह नव वसाहतींची संजय केळकर यांना पसंती

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मोडणाऱ्या आठ प्रभागांत महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी बाजी मारली असून केवळ अल्पसंख्याकबहुल असलेल्या राबोडी प्रभागात महाविकास आघाडीचे राजन विचारे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. महायुतीतर्फे भाजपचे संजय केळकर, महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेतर्फे अविनाश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. श्री. केळकर यांनी मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांना एक लाख २०,४२४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांनी दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांना ६२,१४१ मते मिळाली तर मनसेचे अविनाश जाधव तिसऱ्या क्रमांकावर गेले होते.

या मतदार संघातील प्रभाग क्रमांक २ हिरानंदानी मेडोस येथे श्री.केळकर यांना १०,४४२ इतकी मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मानपाडा-कोलशेत येथे ४,५६३, प्रभाग क्र.४ कापुरबावडी, हिरानंदानी मेडोस या भागात ७,२०१, बाळकूम प्रभाग क्र. ८ येथे ९,७४०, प्रभाग क्र. ११ गोकुळनगर भागातून ७३५९, पाचपाखाडी, टेकडी बंगला, सिद्धेश्वर तलाव प्रभाग क्र.१२मधून ६,०१६, प्रभाग क्र.२१ नौपाडा, गोखले रोड, विष्णूनगर या परिसरातून ११,२८९ आणि खारकर आळी, टेंभी नाका, खारटन रोड, प्रभाग क्र.२२ मधून ८,९९३ मते श्री. केळकर यांना मिळाली आहेत. तर राबोडी, क्रांतीनगर या अल्पसंख्याक मतदार असलेल्या प्रभाग क्र. १०मध्ये श्री. विचारे यांना ८,५५७ इतका लीड मिळाला.

ठाणे महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघात महायुतीचे संजय केळकर यांना मिळालेल्या मतदानानुसार या मतदार संघातील ३६ जागांपैकी ३२ जागा या महायुतीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला अवघ्या चार जागा मिळण्याची आशा आहे.