शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा बैठकीत निर्णय
नवी मुंबई: नवी मुंबई मनपा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज सानपाडा येथे पार पडली. या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी नेते शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार असून बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षापासून आमदार गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याने यावेळी ती खेचून घ्यायचीच असा चंग या तीन पक्षांनी केला आहे.
2015 मधील पक्षीय बलाबल (एकूण जागा-111)
राष्ट्रवादी – 57
शिवसेना – 38
भाजपा – 06
काँग्रेस – 10
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपा – 51 (गणेश नाईक गट)
शिवसेना – 50
राष्ट्रवादी काँग्रेस – 4
काँग्रेस – 6
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरु केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे. तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.