मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी आवश्यक तितक्या प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरी राज्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगामी काळात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तर, पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. १९ जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला, तर दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानं १९ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, २०, २१ जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.