मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची ग्वाही
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आला असून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठिशी मनसे खंबिरपणे उभी असल्याची ग्वाही, मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रचारा दरम्यान दिली.
महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली. तेव्हा नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. नरेश म्हस्के यांचे अविनाश जाधव यांनी जंगी स्वागत करत सत्कार केला. यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, समिक्षा मार्कंडे, शिवसेनेचे हेमंत पवार आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा आदेश आलेला असून ठाणे, कोपरी-पांचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर या सहा विधानसभा क्षेत्रातील मनसैनिक महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. जसजसा प्रचार पुढे जाईल तसतसा मनसैनिकांचा सहभाग अधिक ताकदीने होणार आहे. चौक सभा, बैठका घेतल्या जाणार आहेत. नरेश म्हस्के यांना खासदार केल्याशिवाय मनसैनिक गप्प बसणार नसल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.