मुख्यमंत्रीही अयोध्येला जाणार; ठाण्यात शिवसैनिकांची तयारी सुरू

ठाणे: एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असतांनाच आता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका आणि अयोध्या या दोन्ही आघाडीवर तयारी करण्याच्या सुचना शिवसैनिकांना केल्या आहेत.

बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक टीप टॉप प्लाझा या ठिकाणी पार पडली. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक, विभागप्रमुख आदींसह इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत येत्या १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला कशा पध्दतीने हजेरी लावायची, कशी तयारी करायची यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर येत्या काही दिवसात उध्दव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्याची रुपरेषाही ठरविण्यात आली. अयोध्येची तारीख निश्चित नसली तरी देखील त्याची तयारी आतापासून करा असा सल्लाही यावेळी देण्यात आला. परंतु महापालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे हे अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेनेच्या वरीष्ठ सुत्रंनी दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सध्या सुरु आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरुन ते शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत. त्यात आता उध्दव ठाकरे देखील सभा घेणार असून ते देखील अयोध्येला जाणार असल्याने येत्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा आणखीच तापणार असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसात विविध महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. निवडणुका आपल्यासाठी नवीन नाहीत, मात्र गाफील न राहता या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कामाला लागा अशी सुचनाही यावेळी शिंदे यांनी केल्याचे कळते.