एकनाथ शिंदे परिवारातील चार पिढ्यांकडून एकत्र पूजा आणि वारी
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.
या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.
मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शासकीय महापूजा केली.
विठुरायाच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले. शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शासकीय विश्रामगृहातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि शासकीय महापूजा पार पडली.