ठाणे : हिंदू परंपरेचा प्राचीन दहीहंडीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात ठाण्यातील जांभळी नाका येथे येथे साजरा होत आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या महापुरामुळे आणि दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाचे खऱ्या अर्थाने महोत्सवात रूपांतर केले आहे. महादहीहंडी जगभरात पोहोचून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचे आकर्षण निर्माण केले आहे. या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील आकर्षण ठरेल असा विश्वास आनंद चारिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. त्या सोहळ्यात युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राउत, शिवसेना उपनेते अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, मधुकर (अण्णा) देशमुख, मनोहर गाढवे, चिंतामणी कारखानीस, समिधा मोहिते, रंजनाताई शिंत्रे, स्नेहल कल्सारीया यांची उपस्थिती लाभणार आहे. या धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर समोरील चौकात होणाऱ्या महादहीहंडी उत्सवाला ठाणे व मुंबई येथील गोविंद पथकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. मागील दहीहंडी महोत्सवात २०० च्या वर गोविंद पथकांनी आपली हजेरी लावली होती. ठाण्यातील एक मानाचा व प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव म्हणून आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा महादहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जातो.
मुंबई येथील गोविंद पथकासाठी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच ठाणे येथील गोविंदा पथकासाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची रोख बक्षिसे व स्मृती चषक देण्यात येणार आहे.
महादहीहंडी बरोबर संगीताची मेजवानी
महादहीहंडी आयोजना बरोबर सर्वांना आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला नृत्य मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामावंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकिय पथक
सोहळ्यात उपस्थित राहणा-या गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे. त्यामध्ये कार्डियोलॉजीस्ट, ऑर्थोपेडिक व न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास ५ बेड आरक्षित करण्यात आले आहेत व संपदा हॉस्पिटलचे डॉ.उमेश आलेगावकर यांच्या संयुक्त विद्यामानाने विविध तज्ञ डॉक्टरांचे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच ५०० सुरक्षा रक्षक व कार्यकर्ते सज्ज आहेत.
गोविंदांबरोबर प्रेक्षकांनाही विमा संरक्षण
आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महादहीहंडी उत्सवात सहभागी होणा-या सर्व गोविंदा पथकांना बजाज अलायंझ कंपनीच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार आहे. उत्सव पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचीही संख्या मोठी असते. आनंदाच्या भरात प्रेक्षकांनाही इजा होण्याची शक्यता असते. या दहीहंडी परिसरात असलेल्या प्रेक्षकांनाही काही इजा झाल्यास त्यांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
सेफ्टी रोपची व्यवस्था
महादहिहंडी महोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसुन उत्सव आणि परंपरेला साजेल असा हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दहिहंडीचे मनोरे रचत असताना शेवटच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला ‘उदय आऊट डोअर’ या गिर्यारोहक संस्थेमार्फत सेफ्टी रोप देण्यात येणार आहे. जेणेकरुन गोविंदांचे खालचे थर कोसळले. तरी सर्वात वरच्या थरावर असणारा गोविंदा रोपच्या सहाय्याने सुरक्षितर राहणार आहे. महादहिहंडी महोत्सव साजरा करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता आनंद चॅरिटेबल ट्रस्टने सेप्टी रोपची व्यवस्था केली आहे. या दहीहंडी महोत्सवाच्या दिवशी दुपारी १२ वाजता ठाण्यातील प्रतिष्ठीत महिला गोविंदा पथक व पुरुष गोविंदा पथकांची सलामी देण्यात येणार आहे.