महाविकास आघाडीकडून ठाण्यात शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

अनुभवहीन आपटेला कंत्राट कुणी दिले?-डाॅ.जितेंद्र आव्हाड

ठाणे : मालवण येथे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. मतांसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करीत डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडून मासुंदा तलावावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

ज्येष्ठ, श्रेष्ठ अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत. त्यांना विचारात न घेता या आपटेला कुठून शोधून आणलं? या आपटेने या आधी किती पुतळे बनवले होते? कुठलाही अनुभव नसताना आपटेला कंत्राट का दिले? असा सवाल डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस उपस्थित केला.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने केली. महाराज आम्हाला माफ करा असे फलक घेऊन कार्यकर्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात या आंदोलनात माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाध्यक्ष केदार दिघे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, काँग्रेस महिला अध्यक्षा स्मिता वैती, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मोदी आणि महायुती सरकारवर प्रचंड टीका केली. ते म्हणाले की, वादळवार्‍यामुळे कोकणातील नारळही पडत नाहीत. मात्र, आपटे नावाच्या इसमाने बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळामुळे कोसळतो, तुटतो, फुटतो आणि खाली पडतो. ज्या आपटेने एकही पुतळा बनविला नव्हता, त्या आपटेला कंत्राट मिळते. पुतळा बनवायला तीन-चार वर्षे लागतात. या आपटेने तीन महिन्यात किंवा 15 दिवसांत बनवला. याच्यावर कुणाचं नियंत्रण नव्हतं. तो पुतळा बघितल्यावर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. सर्व कामांत 50 टक्के वाटा घेतला जाणार असेल तर हेच होईल, अशी टीकाही श्री.आव्हाड यांनी केली.