अ गटात मफतलालला विजेतेपद

ठाणे : मफतलाल क्रिकेट क्लबने डाटामॅटिक्स संघाचा सहा विकेट्सनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अ गटातील विजेतेपद मिळवले.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना मफतलालच्या गोलंदाजांनी डाटामॅटिक्स संघाला १७.५ षटकात १४४ धावांवर रोखले. ओम केशकामतने तिन चौकार आणि पाच षटकात ठोकत ५१ धावांची खेळी केली. तर शशांक जाधवने २९ आणि मलंगनाथ आरसने २५ धावा केल्या. प्रसाद पाटीलने २६ धावांत ४ विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्याना दिडशे धावांच्या आत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. रोहित सिंगने २५ धावांत ३ आणि अतुल सिंगने ३९ धावांत २ विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल मफतलाल क्रिकेट क्लबने १९.४ षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात १४५ धावांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. करणसिंह नंदेयने ३२, सिद्धांत अढटरावने ३२आणि पुनीत त्रिपाठीने २३ धावा करत संघाचा विजय सोपा केला. शशांक जाधवने एक आणि अमोल जंगमने दोन विकेट्स मिळवल्या.