रेल्वे प्रवासात डोळा गमावला; ५० लाखांचा हात विम्याने दिला

महिला पोलीस अंमलदाराला एचडीएफसीकडून धनादेश

ठाणे : आंबिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करताना समाजकंटकाने भिरकावलेल्या दगडाने डोळा निकामी झालेल्या महिला पोलीस अंमलदार यांना एचडीएफसी बँकेने ५० लाख रुपये विम्याची रक्कम आज सुपूर्द केली.

ठाणे पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार सुवर्णा मधे या २६ जुलै २०२२ रोजी आंबिवली येथून ठाण्याकडे कर्तव्यावर येत असताना कल्याण ते शहाड दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला. हा दगड सुवर्णा यांच्या डोळ्याला लागून त्यास गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोळ्यावर मुलुंड आणि कल्याण येथील फॉर्टीस रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, परंतु त्यांचा डोळा निकामी झाला.

ठाणे पोलिसांचे वेतन एचडीएफसी या बँकेतून मिळते. त्यांच्याकडे पोलिसांचे बँक खाते उघडताना पोलिसांचा विमा काढण्यात आला होता. कोणत्याही कर्मचारी वा अधिकाऱ्यांना अपंगत्व आले तर ५० लाखाची भरपाई देण्याचा करार बँकेत झाला होता. त्याचा फायदा पोलीस अंमलदार श्रीमती मधे यांना झाला आहे. डोळा निकामी झाल्याबाबत दावा बँकेकडे केला होता. तो दावा मान्य करून बँकेने ५० लाख मंजूर केले होते. तो धनादेश आज अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.