कमी करांमुळेच राज्याला एक हजार कोटींचा तोटा

इंधनावरील व्हॅट प्रकरणी खा.सुप्रिया सुळे यांचा केंद्राला टोला

ठाणे : पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर माहिती देत केंद्रावर टीका केली होती. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात हाच धागा पकडत केंद्राला खडे बोल सुनावले. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात कमी कर असल्याने राज्याला एक हजार कोटींचा तोटा होत असल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे या शुक्रवारी ठाण्यात आल्या होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मशिदीवरील भोंगे आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट भाजपवर टीका करण्याचे टाळले. मात्र महागाई विरोधात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. मशिदी आणि भोंग्यापेक्षा सध्या महागाईचे मोठे आव्हान असून याविरोधात संसदेत देखील अनेक वेळा आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यांवरून आंदोलने देखील सुरु असून ही आंदोलने आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडी सरकारबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोणत्या सरकारचा कर जास्त आहे. हे सर्वाना कळेल. जीएसटीच्या माध्यमातून राज्याला मिळणारे पैसे उशिरा मिळत असून याविरोधात देखील संसदेत केंद्र सरकारचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच दर कमी केले जात असून यामुळे जवळपास एक हजार कोटींचा तोटा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सावध भूमिका घेत यावर भाजपवर थेट टीका करायचे त्यांनी टाळले. मशिदीच्या भोंग्याबाबत मनसेचे राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला असला तरी राज्याचे गृहखाते याबाबत सक्षम असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

देशमुख आणि मालिकांवर अन्यायच

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे सुळे म्हणाल्या. या दोघांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये सातत्य नसल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.