विकास कामांच्या नावाखाली ठामपाच्या तिजोरीची लूट

* आमदार संजय केळकर यांनी दिले पुरावे

* आयुक्त बांगर यांच्याशी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा

ठाणे : ठाणे शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी पुरावे सादर करत संबंधित अधिकारी आणि ठेकदारांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. ठाणेकरांच्या या तिजोरीचे रखवालदार म्हणून भूमिका बजावत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधींची विकास कामे होत आहेत. ही कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केला. यावेळी त्यांनी काही कामांचे पुरावेही सादर केले. या प्रकरणांमध्ये संगनमत असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

कोपरी येथे एक कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला. हे काम अर्धवट असून दर्जाहीन आहे, तरीही त्याचे पैसे कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. केवळ विकासाच्या नावाखाली यात कोट्यवधींची लूट होत होती. याबाबत हरकत घेतल्यानंतर आता १५ तलावांसाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजप विकास कामांच्या विरोधात नसून विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या लुटी विरोधात आहे, असे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.

उथळसर येथील जोगीला तलावासाठी या आधीच साडेतीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही येथील काम अर्धवट आहे. तरीही दुसऱ्या टप्प्यात या तलावासाठी नव्याने तरतूद करण्यात आल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.

शहरातील पदपथांच्या कामातूनही ठेकेदारांनी लूट केल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. त्याच-त्याच पदपथांवर पुन्हा काम करण्यात आले असून या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

या बोगस विकासकामांचे पुरावे श्री.केळकर यांनी सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली. भाजप ठाणेकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

‘श्रीरंग’च्या रहिवाशांच्या सूचना स्वीकारणार

‘श्रीरंग’च्या रस्तारुंदीकरणाबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरण करताना रहिवाशांना त्रास होणार नाही. हे काम करण्यापूर्वी रहिवाशांच्या सूचना आणि हरकतींचा विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितल्याचे श्री. केळकर म्हणाले.