महागिरी कोळीवाडा येथील मच्छी मार्केटला स्थानिकांचा विरोध

ठाणे – खाडी किनारी कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असतानाही ठाणे महापालिका सी आर झेड कायदा पायदळी तुडवून महागिरी कोळीवाडा येथील गणपती विसर्जन घाटावर मासळी मार्केट बांधण्याचा घाट घातला जात होता. परंतु स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर महापालिकेने हे काम बंद केले.

सिडको ते कळवा पूल दरम्यान महागिरी कोळीवाडा येथे खाडी बुजवून पदपथावर मासळी बाजार तयार करण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले आहे. येथे असलेला विसर्जन घाट मातीचा भराव टाकून बुजवला जात आहे. तेथील पदपथावर लोखंडी खांब उभे करून मासळी विक्री करण्यासाठी गाळ्यांची उभारणी केली जात आहे. त्याबाबत अखिल भारतीय कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष परेश कोळी यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपायुक्त शंकर पाटोळे आणि नौपाडा कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांनी लेखी निवेदन दिले आहे. काल नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांनी या शेडची पाहणी केली. त्यावेळी महागिरी कोळीवाडा येथील मासळी विक्री करणाऱ्या ग्रामस्थांनी विसर्जन घाट येथे उभारण्यात येत असलेल्या मच्छी मार्केटला तीव्र विरोध केला.

गणपती विसर्जन करण्याची ही पवित्र जागा आहे. त्याचे पावित्र्य हे मच्छी मार्केट उभारून नष्ट करू नका. मुख्य बाजारपेठ येथे मच्छी मार्केट असताना पुन्हा या मार्केटची काय गरज असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथे मच्छी मार्केट झाले तर आजूबाजूच्या रहिवासीयांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली.

खाडी किनारी कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असताना महापालिकेने या कामाला निधी दिला कसा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथे मच्छी मार्केट उभारण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पदपथावर महापालिकेने दिलेली परवानगी चुकीची असून स्थानिक जनतेचा विरोध आहे. त्यामुळे हे काम बंद करण्याची मागणी केली होती. ती मान्य करून हे काम स्थगित करण्यात आले असल्याचे श्री. कोकाटे म्हणाले.

याबाबत उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त श्री. पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सी आर झेड च्या हद्दीत हे काम करण्यात येणार होते. त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने हे काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत