मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुरडीचा मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघे जखमी इमारत धोकादायक श्रेणीतील

ठाणे: मुंब्य्राच्या जीवनबाग येथील बानू टॉवर या 30 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून घरात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीनजण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आपत्ती विभागाने धाव घेत ही इमारत रिकामी करून सील केली आहे. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील जीवनबाग परिसरातील बानु टॉवर बी विंगमधील पाच मजली इमारत 30 वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळ मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. यावेळी घरात असलेल्यापाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला तर घरातील इतर तीन जण किरकोळ जखमी झाले.

मयत मुलीचे नाव उनेजा शेख असून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इतर तिघांमध्ये उमर शेख (23), मुस्कान शेख (21) आणि इजान शेख (एक वर्षे) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मुंब्रा पोलीस सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित दाखल झाले. या इमारतीमध्ये एकूण 20 सदनिका व सहा गाळे असून या इमारतीचा समावेश सी 2 बी या धोकादायक श्रेणीत करण्यात आला होता. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत सदरची सदनिका रिकामी करून सिल करण्यात आली असून त्यानुसार उर्वरित कार्यवाही बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती ठामपा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.