मिलिंद बल्लाळ यांचे प्रतिपादन
ठाणे : परिक्षेला प्रश्नपत्रिकेमध्ये कविता पूर्ण करा असा पाच गुणांचा प्रश्न असतो. त्या पाच गुणांसाठी विद्यार्थी कविता पाठ करतात. मात्र केवळ गुणांसाठी नाही तर संवेदना जिवंत ठेवण्यासाठी कवितांचा, साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण संवेदना नसतील तर मेंदूचा वापर शून्य असतो. भावनिक ताकद वाढविण्यासाठी, बुद्धीच्या कक्षा रुंदाविण्यासाठी आवांतर वाचन केले पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व दैनिक ठाणे वैभवाचे मुख्य संपादक मिलिंद बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
कळवा येथील ज्ञानप्रसारणी संस्थेच्या बालकवाडी शाळेत ठाण्यातील पहिल्याच बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद बल्लाळ यांनी भूषविले. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते म्हणाले की, आपल्या पाल्याने सर्व गुणांनी समृद्ध व्हावे, सुजाण नागरिक बनावे असे प्रत्येक पालकाला वाटते. मात्र त्यांना तसे घडविण्यासाठी पालकांचा पुढाकार महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्याला इतर चांगल्या सवयींबरोबरच ज्ञानाने समृद्ध करावे. त्यासाठी आधी मुलांना स्वतः काही गोष्टी वाचून दाखवाव्यात. त्यांचा अर्थ समजावून सांगावा. त्यांना मॉलमध्ये घेऊन जात असाल तर आवर्जून तेवढ्याच वेळा वाचनालयात घेऊन जावे. घराचा एक हळवा कोपरा पुस्तकांसाठी राखीव ठेवावा. पुढे ते म्हणाले की, मुलांनीही मला वाचनालयात जायचे आहे, नवीन पुस्तक वाचायचे आहे असा हट्ट पालकांजवळ केला पाहिजे. वाचन क्षमता, ऍनॅलिसिस करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. ज्या साहित्यिकांनी परीकथा, दंतकथा, बालसाहित्याची निर्मिती केली त्यांना विद्यार्थ्यांनी अभिवादन करून वाचनाचा निश्चय केला पाहिजे. त्यातूनच वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होईल.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी, उद्याचे कवी, लेखक निर्माण होण्यास हातभार लागावा, या संकल्पनेतून कळवा येथील ज्ञानप्रसारणी संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना कवी, लेखक बाळ कांदळकर यांच्या संकल्पनेतून कविता वाचन आणि अभिवाचनाचे धडे देण्यात आले. या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांची भाषाविषयक गोडी वाढली असून, जवळपास ६०हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता व काही विद्यार्थ्यांनी लेख लिहिले. विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहून, ज्ञानप्रसारणी शाळेने शनिवारी एक दिवसीय बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. तुतारी, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि साहित्यिक, कवी, लेखक मान्यवरांच्या सहभागातून साहित्य दिंडी निघाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अभिवाचनाचे सादर पार पडले. जेष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे ठाणे शाखा कार्यवाह अजित महाडकर आणि विद्यार्थी अंशुमन यादव यांनी या सदराचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी इयत्ता पहिलीतील रत्नेश्वरी बन, सहावीची सिद्धी रेठरेकर, अंशुमन यादव, सातवीतील दिशांत पुनुगडे, नववीतील पायल जाधव, नेहा जाधव, लावण्या माने, वैष्णवी गावडे या विद्यार्थ्यांनी आपल्या खणखणीत आवाजात अभिवाचन केले. महाडकर यांनी विद्यार्थ्यांना अभिवाचन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सदरात विद्यार्थ्यांचे काव्य संमेलन पार पडले. प्रा. मनीषा राजपूत व विद्यार्थिनी तन्वी शिंदे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी सायली राणे, मृण्मयी शिंदे, तन्वी जाधव, हर्ष मोंडे, अंश सावंत, पार्थ पडवळ, स्वर रहाटे, तन्वी शिंदे, नेहा फडतरे, मयुरी सूर्यवंशी, साहिल माने, हर्ष निकुंभ या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या. प्रा. राजपूत यांनी बालसाहित्यिकांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब खोल्लम, कार्याध्यक्ष भालचंद्र जोशी, सचिव अनिल कुंटे, गिरीश अडथळे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष व बाल साहित्य संमेलनाचे समन्वयक बाळ कांदळकर, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.