* गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण दिमाखात
* ठाणेवैभव, वावीकर आय इन्स्टिट्युट आणि इनरव्हील क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचा संयुक्त उपक्रम
ठाणे: मखरात बसवलेला गणपती सजावटीमुळे सुंदर दिसतो, परंतु तुमच्या मनातील गणपतीचा आवाज तुम्ही ऐकुन चांगले काम करत राहिलात तर आपले शहर सुद्धा तेवढेच सुंदर दिसू लागेल, असे विचार ‘ठाणेवैभव’चे मुख्य संपादक मिलिंद बल्लाळ यांनी मांडले.
‘ठाणेवैभव, वावीकर आय इन्स्टिट्युट आणि इनरव्हील क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ बोलत होते. 28 सप्टेंबर रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील २१ तर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील १० विजेत्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात वावीकर आय हॉस्पिटलचे डॉ.चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया देशपांडे, ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांनी सजावटकारांचे कौतुक केले. डॉ. वैशाली वावीकर घरगुती गणपती सजावटीवर आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या, मी २० वर्षे स्वतः घरी इको फ्रेंडली पद्धतीने सजावट करते आणि मी लोकांनाही हाच सल्ला देते. मला स्वतःला थर्माकॉल याविषयी राग आहे त्यामुळे जेथे इकोफ्रेंडली नाही तेथे मी जाणे टाळते. लोकांनी इको फ्रेंडली सजावट करावी यासाठी ही स्पर्धा दरवर्षी राबवते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हा उपक्रम राबवावा, हा माझा उद्देश असतो, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या पारंपारिकतेला आधुनिकतेचा स्पर्श दिल्याबद्दल सजावटकारांचे अभिनंदन केले.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया देशपांडे यांनी देखील समाजाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या या सजावटकारांचे विशेष कौतुक केले. घरगुती आणि सार्वजनिक या स्पर्धेत २५० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत तन्वी गद्रे, मानसी वैद्य, मृदुला भावे या परिक्षक म्हणून लाभल्या. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रमोद माने यांनी वाचनालय संकल्पनेवर आधारित सजावट करून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रसाद बिर्जे यांनी वर्षभरातील विविध सणांची इको-फ्रेंडली सजावट साकारली होती. भूषण गायकवाड यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेची पारंपारिक सजावट केली होती, ही सजावट गणेशोत्सव आणि विठ्ठलभक्तीचा सुंदर संगम दर्शवत होती. तर माया वायंगणकर यांनी श्रीरामाच्या जीवनावर आधारित सजावट केली होती. राकेश बंद्रे यांनी महाकालची गुहा तयार केली होती. विजय पाटील यांनी पावनखिंडचे दृश्य साकारले आणि विशाल मोरे यांनी जेजूरीचे दृश्य साकारले होते.
इको-फ्रेंडली संदेश देणारे गौरव सहाणे यांनी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेवर आधारित सजावट केली होती. यांनी फ्रूटी, टोपीको आणि ज्यूस यापासून दीपस्तंभ साकारले होते. रिया कुलकर्णी यांनी पंढरपूरच्या वारीचे दृश्य सजावटीतून साकारले. सुनील चव्हाण यांनी वाडा संस्कृती साकारली. विजय बारस्कर यांनी किल्ला उभारला होता. अजय गायकवाड यांनी सजावटीत महिलांचा ढोल ताशा पथकाचे दृश्य साकारले होते. सर्वेश भावे यांनी सजावटीत रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रतिमा निर्माण केली होती. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये आयटी पार्कची सजावट केली होती. तेथेच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला तर त्यांचा लोकलमधून रोजचा जीवघेणा प्रवास वाचेल असा संदेश रुपेश राऊत यांनी देखाव्यातून साकारला होता. अजय काळे यांनी जेजूरीचे दर्शन घडवले. होते. डॉ. अमित आणि सोनाली सराफ यांनी सजावटीत गणपती बाप्पा डॉक्टरांच्या रूपात साकारले होते. गौरव कासार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे दृश्य साकारले होते. मयूर आमणेकर यांनी मंदिर साकारले, जयेंद्र देवरुखकर यांनी जेजुरीचे दृश्य साकारले, ज्योती चव्हाण यांनी अंबाबाईचे मंदिर साकारले तर मनोहर डुंबरे यांनी पेस्टल रंगाच्या कागदी फुलांनी आकर्षक सजावट केली होती. या सर्व सजावटीही अत्यंत प्रभावी ठरल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेला परिक्षक म्हणून मिलिंद क्षीरसागर, मेघना क्षीरसागर आणि प्रिया बर्फीवाला हे लाभले. जय भवानी मित्र मंडळाने ‘निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी’ या विषयावर उत्कृष्ट चल-चित्रांची सजावट सादर केली. ओम शक्ती विनायक मित्र मंडळाने ‘यंग इंडिया’ या विषयावर काम केले तर चैतन्य मित्र मंडळाने ‘वेळीच ओळखा नशेचा विळखा’ या सामाजिक संदेशावर आधारित सजावट केली होती. शिवसम्राट मित्र मंडळाने ‘सुरक्षितता’ या विषयावर इको-फ्रेंडली सजावट केली होती. एकविरा मित्र मंडळाने विठ्ठलाच्या प्रतिमेसह ‘कैफियत समाधानाची’ हा विषय मांडला. सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी जागतिक तापमानात वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हा विषय मांडला. याशिवाय डवले नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘मराठी, मराठा आणि महाराष्ट्र’, शिवाई नगर सहकारी मंडळाने ‘वाहतूक व्यवस्था’ आणि कोलबाड मित्र मंडळाने लाख मण्यांनी साकारलेला ‘काल्पनिक महल’ ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होता. या सजावट प्रकारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. हजुरी उत्कर्ष मंडळ, वागळे इस्टेट यांनी रस्ता सुरक्षितता हा विषय मांडला.
या वर्षीच्या गणपती सजावट स्पर्धेत विजेते ठरलेल्या सजावटकारांचा सन्मान मोठ्या दिमाखात झाला. सर्व विजेत्यांच्या कलेचे महत्त्व जाणून, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्कृती शेलार यांनी केले.