सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही मिळाला पगार अन् झाला सद्गदित

दिव्यांग तरुणाने मानले पूर्वेश सरनाईक यांचे आभार

ठाणे: ठाण्यात राहणारा सत्यम लिंगाळे याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून दिव्यांग असल्यामुळे नोकरीसाठी त्याला अडचणी येत होत्या. त्याची समस्या युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांना कळताच त्यांनी त्याला नोकरी मिळवून दिली होती. सत्यमला नोकरीत एक महिना पूर्ण झाला असून त्याने आज पूर्वेश सरनाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

युवा महाराष्ट्र मेळावा २४ फेब्रुवारीला पार पडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यमला नियुक्ती पत्र देण्यात आले होते. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सत्यमला नोकरी लावून देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केले. आज सत्यम आणि त्याची आई पूर्वेश यांना भेटायला आले होते. त्याचा आज पहिल्या महिन्याचा पगार झाला. तो त्याने पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते स्विकारत त्यांचे मनापासून आभार मानले.

सत्यम हा आमच्या विभागातला असून तो खूप हुशार आहे. दिव्यांग असल्यामुळे त्याला नोकरीसाठी अडचणी येत होत्या. त्याला नोकरी लावून देण्याचे आश्वासन मी दिले होते व ते पूर्णही केले. आज त्याचा पहिला पगार झाला असून त्याच्या यशामुळे तो आणि त्याचे कुटुंब खुश आहेत. त्याला भविष्यात तलाठी बनायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीही मी त्याला मदत करणार आहे. दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका त्याला समान संधी द्या असे
पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

आज मला माझा पहिला पगार मिळाला. हे सर्व पूर्वेश सरनाईक यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यांनी मला काही महिन्यापूर्वी नोकरीचा शब्द दिला होता व तो पूर्णही केला असल्याचे सत्यम याने सांगितले.

माझा मुलगाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे कामाला जात असून मला खूप आनंद होत आहे की, आज त्याच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला. पालक म्हणून आम्हाला खूप आनंद असल्याचे सत्यमच्या आईने सांगितले.