ठाणे: शहर झाडांवर नेत्रदिपक दिसणारी ही रोषणाई वृक्षांसाठी फास ठरत असून त्यावर आसरा घेणार्या शेकडो पक्षी व किटकांसाठी घातक बनली आहे. त्यामुळे झाडांवर नांदणारी जैवविविधता धोक्यात आली असून हा प्रकार तत्काळ थांबवा असा इशारा ठाण्यातील एका पर्यावरण प्रेमीने मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर महापालिकांना नोटीसीद्वारे दिला आहे.
मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांमध्ये सध्या शहर सौंदर्यीकरणाची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे शहरे सुंदर दिसत असली तरी त्याचे साईड इफेक्टही आता जाणवू लागले आहेत. घरगुती आणि सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आणि सोहळे अशा सर्वच प्रसंगात झाडांवर रोषणाई केली जाते. ही रोषणाई मनमोहक तितकीच पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी म्हटले आहे.
कृत्रिम विद्युत रोषणाई वृक्षासोबतच त्यावर अवलंबून असलेल्या पशू-पक्षी छोटे कीटक यांच्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कृत्रिम प्रकाशझोतांचा सर्व सजिवांवर होणार्या दुष्परिणामांबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत. अलीकडच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघानेही याची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली होती. मात्र आपल्याकडे सपशेल या मुद्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वृक्षच नव्हे तर त्यावर असलेली जीवसृष्टी धोक्यात आली असल्याचे त्यांनी नोटीशीत नमूद केले आहे.
हरित लवाद आणि इतर न्यायालयांनीही यापूर्वी अशा सुचना पालिका आणि आस्थापनांना केल्या होत्या. या नोटीसमध्ये राष्ट्रीय हरित लवाद व इतर न्यायालयांच्या निर्णयाच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. तसेच वृक्षांवरील कृत्रिम रोषणाई तत्काळ हटवण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात सर्व संबंधित महानगर पालिकांविरुध्द खटला दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.