खऱ्या आयुष्यात देखील मोठी जाऊ – अंजली जोशी

प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आई, जाऊ, सून आणि एक उत्तम अन्नपूर्णा असलेली टीव्हीवरील लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! मालिकेतल्या मोठ्या बाई. मालिकेप्रमाणेच मोठी बाई हि भूमिका देखील गाजतेय. हि भूमिका अभिनेत्री अंजली जोशी अगदी चोख बजावत आहेत. मालिकेत एकत्र कुटुंबपद्धती खूप सुंदररित्या दाखवण्यात आली आहे.
एकत्र कुटुंबपद्धती बोलत असताना अंजली म्हणाल्या, “मी लग्नानंतर एकत्र कुटुंबात आले आणि मालिके प्रमाणेच मी खऱ्या आयुष्यात देखील मोठी जाऊ आहे. माझ्या लग्नाच्या एका वर्षभरात २ लहान जावा देखील कुटुंबात आल्या. त्यामुळे सासू सासरे, मी माझे पती आणि माझे २ दीर आणि जावा असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. मालिकेप्रमाणेच आमचं खूप गोड आणि प्रेमळ कुटुंब आहे. आम्ही सर्व जावा जवळपास एकाच वयाच्या त्यामुळे आमच्यातील बॉण्डिंग देखील खूप छान आहे. नंतर मुलं मोठी झाल्यामुळे जागेअभावी आम्ही वेगळे राहायला लागलो पण सण आणि वाढदिवसांना आम्ही एकत्र असतो आणि मिळून सर्व साजरे करतो त्यामुळे मला अजूनही मी एकत्र कुटुंब पद्धत असल्या सारखंच वाटतं.”
सेटवरील त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली म्हणाल्या, “आम्ही सेटवर सर्वजण मिळून खूप धमाल करतो. मला सगळे मोठ्या बाईच म्हणतात. आम्हा देशमुख सुनांचे स्वयंपाक घरात खूप सिन शूट झाले आहेत. आम्ही तिथे पाककला करतो. एकदा आम्ही संपूर्ण युनिटसाठी शिरा केला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला होता. इथे आम्ही कुटुंबाप्रमाणेच सगळे एकमेकांना सांभाळून घेतो. आम्ही नाशिक मध्ये शूटिंग करतोय. बरेच जण नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि आपल्या कुटुंबापासून दूर आहेत पण आम्ही इथे सगळे एका कुटुंबाप्रमाणेच गुण्यागोविंदाने राहतो.”