डोळखांब भागात बिबट्याने २२ बकऱ्या केल्या फस्त

शहापूर : तालुक्यातील डोळखांब परिसरातील गुंडा भागातील चिंचवाडी येथील भाऊ हंबीर, रामा हंबीर, नागो हंबीर या शेतकऱ्यांच्या 22 बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या.

चिंचवाडी येथील शेतकरी भाऊ हंबीर, रामा हंबीर यांच्या आजापर्वत परिसरातील जंगलात चरण्यासाठी नेलेल्या 14 बकऱ्या व नागो हंबीर या शेतकऱ्यांच्या आठ बकऱ्या रविवारी पहाटे बिबट्याने फस्त केल्या.

वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीजागेवर जाऊन घटनेचा पंचनामा केला. या शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

पशुधन (पाळीव प्राणी) गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किंमतीच्या 75 टक्के किंवा चाळीस हजार वा यापैकी कमी असणारी रक्कम, मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किंमतीच्या 75टक्के किंवा दहा हजार, तसेच गाय, म्हैस, बैल यांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किंमतीच्या 50टक्के किंवा बारा हजार व पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च म्हणून चार हजार प्रति जनावर आर्थिक मदत देण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. शिवाय औषधोपचार शासकीय व जिल्हा परिषदेच्या पशु चिकित्सालयात करणेस प्राधान्य देण्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे. वन्यप्राणी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी तीन लाख देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेश व उर्वरीत सात लाख रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव रक्कम(एफडी)म्हणून जमा केली जाते.